मेरा युवा भारत व पब्लिक रिलेशन फाउंडेशनतर्फे ‘उत्सव विचारांचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिद्धी सावंत प्रथम, मंदार जोशी द्वितीय तर विठ्ठल दळवी याने पटकाविला तृतीय क्रमांक

सावंतवाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग व पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ‘उत्सव विचारांचा’ या शीर्षकाखाली झालेल्या या स्पर्धेत सिद्धी शशिकांत सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. मंदार दुर्गाराम जोशी द्वितीय, तर विठ्ठल संजय दळवी तृतीय क्रमांकावर राहिला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, शिवसेना ओबीसी तालुकाध्यक्ष वासुदेव होडावडेकर, नायब तहसीलदार सविता तारी, उर्मिला गावडे, सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष सावली पाटकर, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग साथी जयराम जाधव, पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या सचिव फिजा मकानदार, अनुभव शिक्षा केंद्राचे साथी सहदेव पाटकर, सावली फाउंडेशनचे प्रा. सचिन पाटकर, परीक्षक समील नाईक व नारायण परब, अल्ताफ मुल्ला, नासिर मकानदार, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, पत्रकार साबाजी परब आदी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या सचिव फिजा मकानदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यामध्ये युवकांच्या कल्याणासाठी व त्यांना योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी तसेच युवकांना व्यासपीठ मिळावे याकरिता ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे, असे सांगितले. त्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आजपर्यंत जगातील प्रत्येक देशाचा इतिहास अभ्यासला तर लक्षात येते, की जी अलौकिक क्रांती भारतीय युवकांनी केली आहे, अशी क्रांती इतर देशातील लोकांनी केलेली दिसत नाही म्हणून जगाला प्रेरणा आणि क्रांतीचा धगधगता इतिहास देण्याची किमया भारतीय युवकांमध्ये आहे, असे प्रतिपादन करून सर्व स्पर्धकांना आणि युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार सविता तारी मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेसाठी १) आजच्या युवकांसमोरील आव्हाने, २) आजच्या भारतात स्त्री खरंच सुरक्षित आहे का?, ३) येवा कोकण आपलोच आसा पण तो कोकण टिकवण्यासाठी आमची जबाबदारी काय?, ४) कधी मिळेल का कोकणातल्या तरुणाला त्याच्या कोकणातल्या मातीत रोजगार? असे ज्वलंत विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत अंकिता पाटील, दिपाली राऊळ, प्रणिता गवळी, वीणा गावडे, प्राची सावंत, विठ्ठल दळवी, भाविका कदम, वैभवी हानपोड, मंदार जोशी, सिद्धी सावंत, सादिया भाऊ दिन, सुनिधी मराठे, ज्ञानेश्वर गवळी या सर्व स्पर्धकांनी बहारदार वक्तृत्व सादर करून परीक्षकांसह श्रोत्यांची मने जिंकली.

या स्पर्धेत सिद्धी शशिकांत सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. मंदार दुर्गाराम जोशी याने द्वितीय तर विठ्ठल संजय दळवी याने तृतीय क्रमांक मिळवला. तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक विणा वामन गावडे व द्वितीय प्राची गोविंद सावंत यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण समीन नाईक व नारायण परब यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पब्लिक रिलेशन फाउंडेशनचे नासिर मकानदार, श्रुती सावंत, फातिमा मकानदार, ललित हरमलकर, मिताली राऊळ, राकेश जाधव, प्राजक्ता सांगेलकर, विनायक सांगेलकर, तेजस धोंड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कामाक्षी महालकर यांनी केले तर आभार श्रुती सावंत हिने मानले.

error: Content is protected !!