शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता गेला पाण्याखाली
खारेपाटण (प्रतिनिधी) : गेले आठ दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे विजयदुर्ग खाडीला आलेल्या उधाणामुळे खारेपाटण गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून खाडीलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीचे पुराचे पाणी खारेपाटण शहरात घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज सकाळपासून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक. पूर्णतः बंद झाली आहे. खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आव्हान केले आहे.
खारेपाटण येथे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले असून खारेपाटण मंडळ अधिकारी श्रीमती सरिता बोवलेकर ग्राम महसूल अधिकारी श्री प्रवीण लुडबे यांनी खारेपाटण पूर परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे. तर खारेपाटण एस टी बस स्थानक कडे येणारा मुख्य रस्ता देखील पाण्याखाली जाणारा असल्याने सर्व वाहतूक बंद करून खारेपाटण वरचे स्टँड येथे प्रवाशांना जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तर खारेपाटण मध्ये आज सकाळपासून पाणी भरायला सुरुवात झाल्यामुळे खारेपाटण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या दुकानातील समान उचला पाचल व इतरत्र हलविण्यासाठी सुरवात केली आहे.
खारेपाटण येथे आलेल्या पुराचा फटका मच्छी मार्केट परिसराला बसला असून मच्छी मार्केट मध्ये पाणी गेले आहे.तर येथील सर्व दुकान मधून पुराचे पाणी गेले असून खारेपाटण बाजारपेठ ते श्री देव कालभैरव मंदिराकडे जाणार रस्ता देखील पुराच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. तसेच खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून बंदरवाडी कडे जाणारा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.तसेच पुराचे पाणी खारेपाटण येथील शेतीचा भाग असलेल्या बिगे, भाटले, भाटी आदी भागात घुसल्याने येथील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. कारण पुराच्या पाण्या बरोबर वाहून येणारा प्लास्टिक कचरा भात शेती मध्ये अडकून पडत आहे.
खारेपाटण शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या पडत असलेला पाऊस काही तास असाच पडत राहिल्यास खारेपाटण बाजार पेठे मध्ये पुराचे पाणी घुसण्याची दाट शक्यता असल्याने ऐन गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानात भरलेल्या सामानामुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान खारेपाटण आणि पूर परिस्थिती हे नेहमीचेच समीकरण असल्यामुळे प्रशासन देखील म्हणावी तेवढी काळजी खारेपाटण च्या पूर परिस्थिती बाबत घेत नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.












