साकेडीत पोलिसांची धाड ; गावठी दारू अड्डा उध्वस्त

23 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्यानुसार साकेडी बोरीचीवाडी येथे बितोज जुवाव म्हापसेकर (72) हिच्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर शनिवारी दुपारी छापा मारण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी गोवा बनावटीची दारू, गावठी हातभट्टीची दारू तसेच उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा एकूण 23,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सुमारे 15 हजार रुपयांचे 250 लिटर कुजलेले रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धाडीत महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हेडकॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे यांचा सहभाग होता.

बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या घराच्या पडवीत व परिसरात आढळलेल्या दारूच्या बाटल्या, गाडगे, पातेले, लाकडी चाटू, स्टील नळी व नवसागर वड्या असा मोठ्या प्रमाणावर साहित्य हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी संशयित महिलेवर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई), (ब), (ङ), (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी कालच पत्रकार परिषदेत अवैध धंदे थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने कारवाई करत कणकवली पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला.

error: Content is protected !!