ब्युरो व्हिरिटास India कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून पुढे यावे.” पुलक प्रकाश (R.C.E. South Asia Area)

खारेपाटण (प्रतिनिधी) : ‘कोणताही विद्यार्थी त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. अशा गरजू विद्यार्थ्यांना संस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून पुढे यावे,’ असे कळकळीचे उद्गार मुंबई, अंधेरी येथील ब्युरो व्हिरिटास (India) प्रा. लि. कंपनीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी पुलक प्रकाश यांनी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना काढले.

मुंबई, अंधेरी येथील ब्युरो व्हिरिटास कंपनीच्या सीएसआर (CSR) फंडातून आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी ब्युरो व्हिरिटास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ब्युरो व्हिरिटास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलक प्रकाश,फायनान्स डायरेक्टर पायल रुपारेल, हेड ऑफ प्रोक्युरमेंट शांता पुजारी, हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिलिंद पाटील आणि ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर पुरुषोत्तम देवधर यांच्यासह सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक किशोर मोघे आणि सिनियर प्रोग्राम मॅनेजर दिपाली देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकूण ७२ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सुमारे ४००० स्कूल बॅग आणि ११३२ विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य किट शाळांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागांतील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!