सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग भाजपाची या अभियानाची जिल्हा कार्यशाळा गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय (वसंतस्मृती) येथे आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेस पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, दिव्यांगांचा सन्मान, क्रीडा स्पर्धा, मान्यवरांचा सत्कार, दिव्यांगांना उपकरणांचे वाटप यांसारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. तसेच यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम कसे प्रभावीपणे राबवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असून सेवा पंधरवाड्यात अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कार्य करण्याचे नियोजन या कार्यशाळेत होणार आहे.
या कार्यशाळेला भाजपाचे राज्य परिषद सदस्य व जिल्हा विशेष निमंत्रित, जिल्हा व मंडल सेवा सुशासन समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल महामंत्री, मोर्चा / आघाडी जिल्हाध्यक्ष अपेक्षित असून अपेक्षितांनी कार्यशाळेत वेळेवर व पूर्णवेळ उपस्थित राहावे, असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.












