खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगिवे येथील एका अवघड वळणावर कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. गोव्यावरून आलेला व मुंबई खोपोलीच्या दिशेने जाणारा भारत बेंझ कंपनीचा कंटेनर वाहन क्र. MH01DR1945 च्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर मार्गावरच रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक सुदैवाने किरकोळ जखमी होऊन बचावला.

हा अपघात आज बुधवार दि.१० सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास नडगीवे येथील गणेश कर्ले हॉटेल नजीक मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडला. याबाबत अधिक वृत्त असे की, भिसे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कंपनीचा सहा टायर सिंगल एक्सेल असलेला अवजड सामान वाहतूक करणारा भारत बेंझ कंटेनर सुमारे ५ टन कागदी पुठ्ठा घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना नडगीवे येथे अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून महामार्गावर पलटी झाला. कंटेनर सुमारे २० मीटर फरफरटत जाऊन रस्त्यावर अपघातग्रस्त झाला. या अपघातात कंटेनरचा वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून चालकाच्या उजव्या बाजूचा खांदा आणि हाताला लागले आहे. तर वाहनाच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे.
दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील नडगीवे घाट उतरल्यानंतर पुढील असलेली दोन्ही वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी असून यापूर्वी देखील येथे अनेक अपघात घडलेले आहेत. तरी याबाबत हायवे प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुधारणा करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.












