कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिनी जाहीर करण्यात येणारा सन २०२४-२५ चा सन्मान पुरस्कार तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) या विभागातून कणकवली सा. बां. विभाग मधील वैभववाडी उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांना जाहीर झाला आहे. मुंबई येथे मंत्रीमहोदय तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबर, २०२५ रोजी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे आयोजित अभियंता गौरव समारंभात सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून शुभम दुडये यांना गौरविण्यात येणार आहे.

आद्यअभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी १५ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो. अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील राज्यातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वैयक्तिक पुरस्काराने गौरविण्यात येते. कणकवली सा. बां. विभाग मधील वैभववाडी उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांना तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) या विभागातून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाधवडे धबधब्यावर बांधण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या काचेचा पूल उभारणीत शुभम यांचा सहभाग होता. भुईबावडा घाटात जैवविविधतेची चित्रे रेखाटन पूर्ततेतही शुभम सहभागी होते.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करण्यात येते. इमारती रस्ते पूलांची संकल्पना तयार करून संगणकाच्या द्वारे संकल्पचित्र बनवताना तसेच सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना आणि प्रकल्प राबवताना अभियंत्यांचे तांत्रिक कौशल्य पणास लागते. अशा कल्पक अभियंत्यांची सेवा समाजाला फायद्याची ठरते. त्यामुळे राज्य शासनाकडून अशा अभियंत्यांना अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानित करण्यात येते. शुभम दुडये यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!