चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात धामापूर येथे कॅनरा बँक शाखा असून याठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम सुविधा सुरु करण्यात आली होती. परंतु गेला महिनाभर एटीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे कॅनरा बँकेची एटीएम सुविधा बंद पडलेली आहे. काळसे आणि धामापूर या दोन गावामध्ये कॅनरा बँकेची ही एकमेव एटीएम सुविधा असून गावातील ग्राहकाना तातडीची पैशांची गरज लागल्यास सदर एटीएम सुविधा बंद असल्याने गावात दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने 10 किमी. लांब कुडाळ येथे शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे.
त्याचप्रमाणे धामापूर गावामध्ये असलेले ऐतिहासिक धामापूर तलाव हे जागतिक निसर्ग पर्यटन स्थळ असून जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड झालेले जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने या गावात देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही फार मोठी असते. त्यामुळे स्थानिक ग्राहकांसह पर्यटकानाही गावातील या एटीएम चा फायदा होत असतो.
परंतु गेला तब्बल महिनाभर कॅनरा बँकेचे हे एटीएम बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तरी कॅनरा बँक शाखाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी याची दखल घेऊन सदर एटीएम लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी स्थानिक ग्राहकांमधून होत आहे.












