जलसंपदा विभागाच्या फोंडाघाट येथील गोदामातून ९५ हजारांचे रुपयांचे साहित्य चोरीस

कणकवली (प्रतिनिधी) : ​कणकवली तालुक्यात घरफोडीच्या सत्रानंतर आता शासकीय कार्यालयांना चोरटे टार्गेट करत आहेत. फोंडाघाट येथील जलसंपदा विभागाच्या वसाहतीमधील पाटबंधारे खात्याच्या गोदामातून स्लुईस व्हॉल्व्ह आणि इतर साहित्य असा एकूण ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सहाय्यक अभियंता श्रेणी १ आकाश ज्ञानेश्वर जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पाटबंधारे विभागाचे गोडाऊन फोंडाघाट येथे आहे. या गोदामाची देखभाल करण्यासाठी ज्ञानेश्वर परब हे चौकीदार म्हणून कार्यरत आहेत. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता परब यांनी गोदामाला कुलूप लावून कामकाज संपवले. त्यानंतर रविवारची सुट्टी असल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ते पुन्हा ड्युटीवर हजर झाले.

त्यावेळी त्यांना गोदामाचा दरवाजा उघडा दिसला आणि खिडकीचे लोखंडी ग्रील गायब असल्याचे लक्षात आले.
​तात्काळ त्यांनी सहायक अभियंता आकाश जाधव यांना घटनेची माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, गोदामातील काही सामान चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या सामानामध्ये अंदाजे ८०,००० रुपये किमतीचे १६० मी. मी. स्लुईस व्हॉल्व्हचे १६ नग, ३,००० रुपये किमतीचा ९० मी. मी. स्लुईस व्हॉल्व्हचा १ नग, आणि १२००० रुपये किमतीचे व्ही नॉचचे २ नग असे एकूण ९५,००० रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले आहे.

चोरट्यांनी गोदामाच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून ही चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!