अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : ऑन ड्युटी पोलीस हवालदारावर चाकूने खूनी हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यातील आरोपी राजरत्न अंकुश देवकर (रा. कोकिसरे, नारकरवाडी) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. हा गुन्हा ९ एप्रिल २०२२ रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला होता. कुमार स्वामी याने ११२ वर फोन करून भाडेकरू चा वेडसर मुलगा राजरत्न अंकुश देवकर हा हिंसक बनला असून मदत हवी असल्याचा कॉल केला होता. त्यानुसार हवालदार शैलेश कांबळे, रमेश नारनवर, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ घटनास्थळी पोचले.
घटनास्थळी घराच्या दारात राजरत्न हा दोन्ही हातात चाकू घेऊन उभा होता. राजरत्न याला डॉक्टरकडे नेण्यासाठी अम्ब्युलन्स घराजवळ उभी होती. पोलिसांना पाहून राजरत्न याने तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, वडिलांना माझ्या प्रॉपर्टी चा हिस्सा द्यायला सांगा असे म्हणत त्याने घरात जाऊन घराचा दरवाजा बंद केला. राजरत्न पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी घराचा मागील दरवाजा बंद करून घेतला आणि समज म्हणून दरवाजाला धक्का मारला असता दरवाजा तुटून पडला. त्यानंतर मागील दाराकडे राजरत्न दोन्ही हातात चाकू घेऊन आला. तुम्ही आमच्या भानगडीत का पडता? असे म्हणत चाकू घेऊन पोलिसांच्या अंगावर धावला. तेव्हा कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ यांनी पाठीमागील बाजूस उडी मारून स्वतःचा बचाव केला. राजरत्न याने बाजूला उभे असलेल्या हवालदार रमेश नारनवर यांच्या अंगावर उडी मारली. त्यामुळे नारनवर आणि राजरत्न दोघेही खाली पडले. हवालदार नारनवर यांनी चपळाईने दोन्ही हातात चाकू असलेल्या राजरत्न याला खाली खेचून त्याला काबूत आणण्यासाठी त्याच्या उरावर बसले. परंतु बेभान झालेल्या राजरत्न याने दोन्ही हातातील चाकूने हवालदार रमेश नारनवर यांच्या पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तुमचा मुडदाच पाडतो असे म्हणू लागला. नारनवर यांच्यावर हल्ला केल्याचे पाहताच कॉन्स्टेबल कृष्णात आणि रामकुमार स्वामी यांनी धावत जाऊन राजरत्न याचे दोन्ही हात धरून त्याच्या हातातील चाकू काढून घेतले. नंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी हवालदार नारनवर आणि राजरत्न यालाही अम्ब्युलन्स मधून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. या बाबत कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजरत्न देवकर विरोधात आयपीसी ३०७, ३५३, ३३२ व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई यांनी केला होता.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलेले घटनास्थळाचे पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. तसेच वरिष्ठ नायालयाचे न्यायनिवाडे यांचे संदर्भ देत आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आयपीसी कलम ३०७, ३५३, ३३२ नुसार आरोपी राजरत्न देवकर याला दोषी धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशमुख यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली.












