कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४७ च्या सातव्या दिवशी षष्ठी तिथीला षोडषी महात्रिपुरसुंदरी रूपात सजली आहे. पूर्वी मदनाच्या राखेतून शिवगणांनी एक भस्माची मूर्ती तयार केली. तिला सजीव करून शिव मंत्राचा उपदेश केला. शिववरदानाने उन्मत्त होऊन त्या भंडासूर नावाच्या असुराने स्वतःच्या शरीरातील आणखी दोन दैत्य तयार केले. त्यांचे नाव विषंङ आणि विशुक्र या सर्वांनी सृष्टीतला जीवन रस शोषून घेतला. विषंङाने सगळं विषमय केलं तर विशुक्राने सर्वातले बल काढून घेतले. त्यामुळे निस्तेज झालेल्या देवांनी शिवाला गाऱ्हाणे घातले. भगवान शंकरांच्या सांगण्यावरून सर्व देवतांनी आत्माहुतीचा यज्ञ केला. त्यातून पराशक्ती ललिता महात्रिपुरसुंदरी प्रकट झाली. जिच्या एका हातात उसाचे धनुष्य पंचफुलांचे बाण पाश आणि अंकुश ही आयुध होते. या महात्रिपुरासुंदरीने स्वतःच्या शरीरातून पुन्हा सर्व देवांना प्रगट केले. तिथे षोडष वर्षा रूप बघता सर्व देवांना विस्मय वाटलं. तिने स्वतःच्या शरीरातून आणखी दोन देवता प्रगट केल्या त्या म्हणजे श्यामा आणि वाराही. पुढे अनेक प्रकारच्या योगिनींना प्रगट करून तिने श्री चक्र रथावर विराजमान होऊन भंडासुराचा संहार केला तीच ही षोडषी.
भगवती महात्रिपुरसुंदरीचे रूप वर्णन करताना तिच्या श्रीमत सिंहासनाचे दिव्य वर्णन केले जाते. देवीच्या महा सिंहासनाचे चार पाय म्हणजे ब्रह्मा विष्णू रुद्र अर्थात शंकर आणि ईश्वर हे आहेत. यातला ईश्वर म्हणजे सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य असणारा मुक्त योगी. तर या सिंहासनाची आडवी फळे म्हणजे साक्षात भगवान सदाशिव अर्थात पराशक्तीचे व्यक्त होण्याचे माध्यम त्यांच्या हृदय कमात ही महात्रिपुरसुंदरी विराजमान आहे. तिच्या दोन्ही बाजूला रमा आणि वाणी म्हणजे लक्ष्मी सरस्वती वारे घालण्यासाठी उभ्या आहेत. याचा अर्थ लक्ष्मी अर्थात धनसंपदा आणि सरस्वती म्हणजे विद्या या दोन्ही सुद्धा जिच्या सेवेने सहज प्राप्त होतात. इतकच नव्हे तर सृष्टी निर्मितीच सामर्थ्य सुद्धा सहज शक्य होतं अशी विश्वातली परब्रह्म शक्ती अर्थात ललिता महात्रिपुरसुंदरी. अशीही पराम्बा षोडषी श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता आपणा सर्वांवर कृपा करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः











