वैभववाडी (प्रतिनिधी) : कुंभवडे येथील शेतकरी संजय आमकर यांच्या भातशेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान करण्यात आले आहे. तालुक्यात वन्य प्राण्यांकडून भात शेती व नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. हाता तोंडाशी आलेला घास वन्य प्राण्यांकडून खाऊन नासधुस केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आमकर यांची कुंभवडे येथे एका ठिकाणी सुमारे ३. ५ एकरवर भात शेती आहे. या शेतीत गवारेडा, रान डुक्कर, माकडे यांनी हैदोस घातला असून तयार झालेल्या उभ्या भात पिकाची खाऊन, त्यात हिंडून फिरून मोठया प्रमाणात पिकाची नासधूस केली आहे. याबाबत आमकर यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर वन रक्षक वैशाली कांबळे व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावात वन्यप्राण्यांकडून भात शेती, नाचणी पीक यांचे नुकसान करीत आहेत. मात्र सातबारावर अनेक सहहिशेदार असल्यामुळे कागदपत्रे जमा करून सादर करणे हे खूपच किचकट, व खर्चिक असल्यामुळे शेतकरी मूग गिळून नुकसान सहन करावे लागत आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी असलेल्या जाचक अटी कमी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.













