फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सकडून पर्यावरणप्रेमाचा आदर्श उपक्रम

उगवाई नदीपात्रातील स्वच्छता मोहीम फत्ते ! परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या कॅडेट्सनी पर्यावरण संवर्धनाचा व समाजातील स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी “स्वच्छ नदी – निरोगी गाव” हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत एनसीसी कॅडेट्सनी फोंडाघाट येथील उगवाई नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जमा झालेला अंदाजे ५० किलो प्लास्टिक कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या हवाली केला. उगवाई नदीपात्रात स्थानिक पातळीवर प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने नदीतील जलप्रवाहावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील एनसीसी युनिटने पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने विद्यार्थ्यांना घेऊन नदी स्वच्छतेचा उपक्रम राबवला.

या उपक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील कॅडेट्सनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी नदीकाठ, झुडपांखाली आणि दगडांमागील साचलेले प्लास्टिक, बाटल्या, पिशव्या आणि अन्य अवजड कचरा हातमोजे सुरक्षितपणे गोळा केला. सुमारे दोन तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत अंदाजे ५० किलो प्लास्टिक कचरा संकलित झाला. हा कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.

या कार्यात फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना आग्रे तसेच ग्रामविकास अधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहकार्य दिले. सरपंच सौ. आग्रे यांनी कॅडेट्सचे अभिनंदन करताना सांगितले, “स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेला हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शन असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्यावरण संतुलनाचे महत्त्व स्पष्ट केले. “नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तिचे रक्षण करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, एनसीसीचे प्रशिक्षण हे केवळ सैनिकी शिस्त घडविण्यासाठी नसून सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे.

या उपक्रमासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व एनसीसी कॅडेट्सना भविष्यातही असेच उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे फोंडाघाट परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली. अनेक ग्रामस्थांनी कॅडेट्सना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.

एनसीसीच्या या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जबाबदारीची भावना, संघभावना आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यांचा उत्कृष्ट परिचय झाला. या उपक्रमाद्वारे कॅडेट्सनी ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या राष्ट्रीय अभियानाला स्थानिक पातळीवर चालना दिली असून, फोंडाघाट परिसरात स्वच्छतेबद्दल नवचैतन्य निर्माण केले आहे.

error: Content is protected !!