“त्यांना” तडीपार करा

मनसेने पोलीस निरीक्षकांकडे केली मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात गोमांस आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे केली आहे.

अलीकडेच सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात गोमांसाचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात अटक केलेला आरोपी यापूर्वीही अशाच गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे समाजात तणाव निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींविरुद्ध तातडीने तडीपाराची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.

तसेच, अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपीची सखोल चौकशी करून हे पदार्थ कोठून आणले आणि कोठे विकले जाणार होते, याचा सखोल तपास करून त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!