वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बीएसएनएल मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही बीएसएनएल कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्राहकांनी आपली सिम कार्ड अन्य कंपनीकडे पोर्टेबल केली आहेत. तर आता ग्राहक पुरते हैराण झाले असून सामुदायिक पणे बीएसएनएलची सिम कार्ड परत करण्याच्या पवित्र्यात आहेत. याला कंपनीचा आनागोंदी कारभार जबाबदार आहे. येत्या पंधरा दिवसात यात सुधारणा झाली नाही तर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी उपमंडल अभियंता बीएसएनएल कणकवली यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वैभववाडी तालुका हा डोंगराळ तालुका आहे. तालुक्यात बीएसएनएलचे अनेक टॉवर आहेत. मात्र हे टॉवर म्हणजे शोभेच्या बावल्या ठरल्या आहेत. या टॉवरची सेवा ही वारंवार विस्कळीत होत असते. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास या टॉवरला बॅटरी बॅकअप नसल्यामुळे सेवा पूर्णपणे खंडित होते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेटवर्कच्या विस्कळीत सेवेमुळे शासकीय कामकाज, बँकिंग सेवा, व्यापारी सेवा यावर त्याचा मोठा परिणाम होत असून ग्राहकांना तासंतास नेटवर्कसाठी ताटकळत राहावे लागत आहे. बीएसएनएल सेवेच्या या अनागोंदी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करूनही याकडे कंपनी दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे त्रस्त झालेले ग्राहक सामुदायिक रित्या आपली सिमकार्ड बीएसएनएल कडे जमा करण्याच्या पवित्र्यात आहेत. येत्या पंधरा दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला आहे. यावेळी शांताराम नेवरेकर, अशोक मुंडेकर, जयवंत जाधव, शशिकांत वळंजु, किशोर जाधव, सिद्धार्थ कांबळे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.












