विमा कंपनीस ग्राहक आयोगाचा दणका

अपघातग्रस्त गाडीची एकूण साडेसात लाख रुपये नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आदेश

कुडाळ (प्रतिनिधी) : मारुती स्विफ्ट गाडी अपघातात पूर्णपणे निरुपयोगी झाल्याने तक्रारदार मोहन राऊळ, कुडाळ यांच्यावतीने अँड. दीपक अंधारी यांनी दाखल केलेल्या ग्राहक आयोगाकडील तक्रारअर्जाचे कामी एकूण साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीस आदेश करण्यात आले आहेत. कुडाळ येथील मोहन राऊळ यांच्या मालकीची मारुती स्विफ्ट गाडी सन २०१९ मध्ये अपघात ग्रस्त झाली होती. त्यावेळी त्या गाडीची संपूर्ण जोखीम स्वीकारणारी विमा पॉलिसि रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीकडे उतरवलेला होता. अपघातात गाडी पूर्णतः मोडतोड होऊन खराब झाली होती. सदर गाडी दुरुस्ती करिता येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक मारुती कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटर मध्ये तयार करण्यात आले होते, ते एस्टिमेट गाडीच्या आयडीव्ही म्हणजे गाडीची विमा कंपनीने पॉलिसीमध्ये निश्चित केलेली किंमत पेक्षा जास्त होती. अशा परिस्थितीत सदर गाडी टोटल लॉस करून गाडीची आयडीव्ही किंमत देणे हे विमा कंपनीवर बंधनकारक असते. त्याकरिता मोहन राऊळ यांनी विमा कंपनीशी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही विमा कंपनीने त्याची दाद घेतली नाही म्हणून मोहन राउळ यांनी विमा कंपनी विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रितसर खटला अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्ज चे कामी योग्य ते तोंडी लेखी पुरावे झाले नंतर ग्राहक आयोगाने सदर तक्रार अर्जाचा निकाल गुणदोषावर तक्रारदारच्या बाजूने दिला.

सदर निकाल पत्रातील आदेशाप्रमाणे तक्रारदारला अपघातग्रस्त गाडीच्या नुकसान भरपाईपोटी विमा कंपनीने गाडीची आयडीव्ही किंमत रुपये ४, ६३, ५७५/- अदा करावी.सदर रक्कमे वर दिनांक ८ एप्रिल २०२२पासून संपूर्ण रक्कम वसुल होईपर्यंत दसादशे नऊ टक्के दराने व्याज द्यावे. त्याचबरोबर सदर गाडीची नुकसान भरपाई वेळेत न मिळाल्याने,तक्रारदार ला गाडी बाबत झालेल्या गैरसोई करिता विमा कंपनीने ७५ हजार रुपये तक्रारदारला द्यावेत तसेच तक्रारदारला झालेल्या मानसिक त्रासापोटी पन्नास हजार रुपये व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रुपये ११४२५/- रुपये विमा कंपनीने द्यावेत.अशा प्रकारे विमा कंपनीने गाडीचे मालक श्री राउळ यांना व्याज,खर्चासह एकूण नुकसान भरपाई रुपये सात लाख पन्नास हजार अदा करावेत असा निर्णय झाला आहे.सदर प्रकरणी सिंधुदुर्ग ग्राहक आयोगाचे अध्यक्ष श्रीमती इंदुमती मल्लूष्टे व आयोगाचे सदस्य योगेश खाडीलकर यांनी निकालपत्र जाहीर केले आहे. अशा प्रकारे अपघात ग्रस्त गाडीची नुकसान भरपाई देण्यास या ना त्या कारणाने टाळटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांना या आदेशाने चांगलीच चपराक मिळणारी आहे,असे मत अनेक ग्राहक व तक्रारदार यांनी व्यक्त केले आहे. तक्रारदारच्या वतीने एडवोकेट दीपक अंधारी यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!