वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती मुंबई सचिव, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. दत्ताराम सीताराम नागप (वय ६०, रा. आखवणे) पुनर्वसन गावठाण यांचे शुक्रवारी पहाटे पंढरपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कार्तिकी वारी निमित्त ते दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपल्या संपूर्ण परिवारासह दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे गेले होते. गुरुवारी रात्री पंढरपूर येथे कीर्तन करून ते आपल्या वाड्यावर निवासासाठी गेले असता पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यातच त्यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.
दत्ताराम महाराज नागप यांचे वडीलही वारकरी व कीर्तनकार होते. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा वारकरी व कीर्तनकार म्हणून असलेला वसा पुढे जोपासला होता. मुंबई बेस्ट मधून दोन वर्षांपूर्वीच अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. मुंबई येथे नोकरी निमित्त असले तरी गावच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून ते समितीच्या स्थापनपासून काम करीत होते. अरुणा धरणग्रस्तांना खासबाब म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करून घेतले. तसेच धरणग्रस्तांचा मोबदला व आखवणे भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाण निर्मितीत व सेवा सुविधा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. यांच्या आकस्मित निधनामुळे आखवणे भोम नागपवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.












