कणकवली पोलिस निरीक्षक श्री नलावडे यांना दिले लेखी निवेदन
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या वाडीत मंगळवारी झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा. या करिता शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी नुकतीच आज कणकवली तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री नलावडे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले. व घरफोडी प्रकरणातील पोलिस तपासाची माहिती जाणून घेतली. खारेपाटण पंचक्रोशीतील नडगिवे या गावात झालेल्या धाडसी घरफोडी व चोरीचा तपास अधिक जलद गतीने व्हावा आणि परिसरातील पोलिस सुरक्षा व गस्त वाढविण्याबाबत मंगेश गुरव यांनी आज कणकवली येथे पोलिस निरीक्षण श्री नलावडे साहेब यांची भेट घेतली.व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी दिलेल्या लेखी निवेदनात १) या भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवणे. २) खारेपाटण पोलिस दुरशेत्रात पोलिस संख्या वाढविणे. ३)खारेपाटण पोलिस ओ. पी. इमारतीची दुरुस्ती व सक्षमीकरण करणे. ४) खारेपाटण शनिवार आठवडा बाजार दिवशी अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. आदी प्रमुख मागण्या मांडलेल्या असून या निवेदनाची एक प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देखील देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान खारेपाटण शहरा पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या गावात एकाच रात्री एकाच वाडीतील सहा बंद घरे फोडल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे खारेपाटण परिसरातील शांततात आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा आतातरी तातडीने जागी होऊन ठोस पावले उचलणार आहेत का ? असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.











