एकता दौड ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात उत्साहात ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही दौड शिव उद्यान सावंतवाडी येथून सुरू करून नारायण मंदिर सावंतवाडी समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही ‘एकता दौड’ काढण्यात आली. या दौडमध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार, शहरातील रिक्षा चालक-मालक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेली मुले, तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. पोलीस दलाने रिक्षा चालक-मालक आणि युवकांना सोबत घेऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशाच्या ऐक्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण या ‘एकता दौड’ने पुन्हा एकदा करून दिले.












