कुडाळ-मालवण रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उद्धवसेनेचे बैलगाडीतून जनआंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे होबळीचा माळ येथे शिवसैनिक रस्त्यावर

अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिलाही आक्रमक

चौके (प्रतिनिधी) : “आज जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यातही कुडाळ नेरूर पार मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमदारांनी आपला येण्याजाण्याचा रस्ताच बदलला आहे. ते कुडाळ येथून नेरुरपार मार्गे मालवणला न जाता हायवेने कसाल मार्गे मालवणला जात आहेत. आणि यांना निवडून देणारी जनता मात्र खड्ड्यातूनच प्रवास करत आहे. माझी येथील आमदार, खासदार, पालकमंत्री यांना विनंती आहे कीं तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा जिल्ह्यात या आमच्या वर टीका कराच, हिंदुत्वाचा विषय घ्याच, उद्धवजीं वर टीका कराच, मतांची चोरी कराच, पण एकदा या रस्त्यावरूनही एकदा प्रवास करा आणि तुम्हाला जर वाटलं कीं ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिल आहे ती जनता सुस्थितीत राहिली पाहिजे तर हे रस्ते मात्र नक्की करा असा उपरोधीक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी काळसे येथे रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उद्धव सेनेने महायुती सरकार विरोधात केलेल्या जन आंदोलनावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांना लगावला.

दरम्यान कुडाळ मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थे विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे होबळीचा माळ येथे महायुती सरकार विरोधात बैलगाडीतून जन आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात उद्धव सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ नगरसेवक मंदार शिरसाट, नितीन वाळके, अमरसेन सावंत, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर, प्रमोद म्हाडगुत, मंदार ओरसकर, वंदेश ढोलम, शिवा भोजणे, अमित भोगले, राजू परब, उमेश प्रभू, नंदू प्रभू, देवेंद्र म्हापणकर, रुपेश वर्दम, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर काळसे ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हापणकर, दीपिका म्हापणकर, जागृती भोळे, दिव्या परब, सुजाता परब, स्मिता म्हापणकर, मिताली कदम, राजश्री म्हापणकर, साक्षी परब, गौरी परब, मालती परब. यांच्या सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवण उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा लोखंडे, आणि कुडाळ उपविभागाचे कनिष्ठ अभियंता महेश पवार यांना माजी आमदार वैभव नाईक आणि आंदोलकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारून धारेवर धरले त्यावेळी येत्या दोन ते तीन दिवसात या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली. तर आज सुरु केलेले आंदोलन जोपर्यंत रस्ते सुस्थीतीत होत नाहीत तोपर्यंत वारंवार सुरूच राहील कारण कुडाळ मालवणमधील जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही यापूर्वीही लढत आलेलो आहोत आणि यापुढेही लढत राहू असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. दरम्यान आजचे आंदोलन सुरु होण्यापूर्वी एक डंपर आंदोलन स्थळी येऊन खडी ओतून गेला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी डंपर चालकास विचारणा केली असता डिपार्टमेंट ने खडी उतरवण्यास सांगितले असे सांगितले, परंतु याबाबत आंदोलन स्थान उपस्थित झालेल्या कनिष्ठ अभियंता सदर डंपर आणि खडी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की डिपार्टमेंट ने कोणताही डंपर खडी भरून पाठवला नव्हता. मग तो डंपर कोणी पाठवला या विषयावरूनही आंदोलक आक्रमक झालेले दिसून आले. आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सदर जन आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

error: Content is protected !!