मानवतेचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज – प्रा. राजेंद्र मुंबरकर

गोपुरी आश्रमात ‘कोकणचे गांधी’ आप्पासाहेब पटवर्धन जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : सध्या देशात जातीधर्माच्या विद्वेषाचे, द्वेषपूर्ण वक्तव्यांचे आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बदलून माणुसकी आणि मानवतेचे वातावरण तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजात मानवतेची पेरणी करण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे आणि हे काम गोपुरी आश्रम सातत्याने करत आहे, असे प्रतिपादन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. ‘कोकणचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे संचालक युयुत्सु आर्ते, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, संदीप सावंत, अमोल भोगले, सदाशिव राणे, राजेंद्र कदम, जयवंत वाईरकर, प्रवीण गुरव, प्रतीक गोसावी, भाविक गोसावी, पुंडलिक कदम, प्रकाश आरोलकर, बाळकृष्ण सावंत, संदीप साटम, किशोर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. मुंबरकर पुढे म्हणाले, “गोपुरी आश्रमात ‘जीवन शिक्षण उपक्रम’ राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत लहान मुलांवर नकळत संस्कार घडवले जातात. महापुरुषांचे विचार आणि आदर्श तरुण पिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी आणि इतर राष्ट्रपुरुषांचे चरित्र वाचल्यास जीवनाचे खरे मूल्य समजते,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याचा वारसा गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. आश्रमाबद्दल सर्वांना आस्था आहे, परंतु प्रत्यक्ष काम करण्यासाठी फार थोडे लोक पुढे येतात. दुर्दैवाने, आज कॉंग्रेस पक्षासह कोकणवासीयांनाही आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याचा विसर पडल्याची खंत आहे.” माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे कार्य गोपुरी आश्रम करत आहे. या कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे हीच आप्पासाहेब पटवर्धन यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन प्रा. मुंबरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सदाशिव राणे यांनी मानले.

error: Content is protected !!