आंबोलीत वृद्धेचे मंगळसूत्र चोरणारे गजाआड

सावंतवाडी पोलिसांची सुपरफास्ट कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली-नांगरतास येथील एका ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरून नेणाऱ्या तीन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी (ता. हातकणंगले) येथून या तिन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. लवकरच गुन्ह्यात वापरलेली गाडी व चोरलेले सोने हस्तगत करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. तक्रार दाखल होताच सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि हातकणंगले येथील हुपरी येथून आरोपींना ताब्यात घेतले. अकबर साहेबजी दरवेशी (वय २४, रा. शाहूनगर रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), चंद्रकांत प्रभाकर गायकवाड (वय ३४, रा. बिरदेव रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), राकेश विजय कंगणे (वय ३४, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्या तीनही चोरट्यांनी नावे आहेत. दरम्यान त्यांना अटक करून आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, गौरव परब, सचिन चव्हाण यांच्या पथकाने ही केली आहे.

error: Content is protected !!