वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन वैभववाडीत उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वंदे मातरम या गीताने भारत देश स्वतंत्र झाला परंतु या गीताला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. 150 वर्षानंतर या गीताला स्वातंत्र्य मिळाले आहे. जगात देशाला मातृत्वाचा दर्जा देणारा भारत हा एकमेव देश आहे. वंदे मातरम या गीताने इतिहास घडवला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा तो जयघोष होता. या जयघोषाने देशातील सर्वसामान्य माणूस देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला. अशा या क्रांतिकारी गीताच्या बाबतीत होत असलेल्या राजकीय वादात न पडता तरुणांनी जगण्याची प्रेरणा देणारे गीत म्हणून आत्मसात करावे असे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शिरसट यांनी केले.

शहीद विजय साळसकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभववाडी यांच्यावतीने वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन सोहळा अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शिरसाट बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, श्री. निकम, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संतोष टक्के, श्री. देसाई, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, प्रकाश अडुळकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वडर, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव गवळी, प्रा. एस. एन. पाटील, वसंत साळसकर, मुख्याध्यापक नादकर, आयटीआय चे अमोल राणे, तसेच समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी आपल्या मनोगतात वंदे मातरम गीताचे महत्त्व विशद केले.

यावेळी अ. रा. विद्यालयाच्या भव्यपटांगणावर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच मान्यवर यांनी सामूहिक वंदे मातरम संपूर्ण गीत गायन केले. या दिनाच्या औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तील विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा ढवण यांनी केले.

error: Content is protected !!