सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस चा स्वतंत्र बाणा

नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाच्या 20 जागा लढवणार`

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आम्ही ‘महायुती’चे भाग असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारले जात नाही. त्यामुळे आम्ही त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत शिंदे शिवसेना व भाजपला मुदत देत आहोत. मात्र आता आम्ही सावंतवाडीच्या 20 ही जागांवर आमच्या उमेदवारांना उभे करणार असून नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून उल्का उमाकांत वारंग यांचे नाव आमच्या पक्षातर्फे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी दिली. आज मंगळवारी सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. भोसले बोलत होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव शफिक खान, संपर्क प्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांचे वतीने अनंतराज पाटकर, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, शहराध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना निर्मल, जिल्हा उपाध्यक्ष मानसी देसाई, जिल्हा उपाध्यक्ष गुरुदत्त कामत, अॅड. सत्यवान चेंदवणकर, दीपक देसाई, सत्यजित देशमुख, सत्यप्रकाश गावडे, सतीश नाईक, डॉ. तुषार भोसले यांसह अन्य उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग म्हणाले की, महायुतीचे दोन्ही पक्ष जर आम्हाला कमी लेखण्याची चूक करत असतील तर महायुतीला त्याची उत्तरे आगामी काळात मतदार मतपेटीतून नक्कीच देतील. त्यामुळे केवळ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे सर्वस्व नाहीत. आमचा पक्ष कुठेही कमी नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधीही कमी लेखू नये. आम्ही निवडणूक लढविण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे आहेत, असे श्री. वारंग म्हणाले.

error: Content is protected !!