१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात सहकार सप्ताहाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या सप्ताहात देशभरातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी संबंधित संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार व प्रसार करतात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यातून सहकाराशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. सहकार चळवळ जिल्ह्यात अधिकाधिक बळकट करण्यासाठी भर दिला जाणार असून सहकार सप्ताहाचा मूळ उद्देश ग्रामीण व शहरी भागात सामाजिक ऐक्य आर्थिक विकासाला चालना देणे, शेतकरी, महिला, युवक, लघु व्यापारी, ग्राहक, विविध आर्थिक स्तरातील लोकांना सहकाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा आहे.

सदर सहकार सप्ताहाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष प्र. दळवी यांचे अध्यक्षतेखाली व सहकार क्षेत्रातील जेष्ठ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आर. टी. मर्गज यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात होणार आहे. या सहकार मेळाव्यांचे आयोजन सहकार क्षेत्रातील महनीय व्यक्तिंच्या उपस्थितीत पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.

• दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्याचा सहकारी मेळावा देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. याच्या जामसंडे येथील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता.
• दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दोडामार्ग तालुक्याचा सहकारी मेळावा कळणे हायस्कुल, कळणे येथे सकाळी १०.३० वाजता.
• दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सावंतवाडी तालुक्याचा सहकारी मेळावा कोलगांव विकास सेवा सोसायटी कोलगांव येथे सकाळी १०.३० वाजता.
• दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी कुडाळ तालुक्याचा सहकारी मेळावा कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ, कुडाळ येथे सकाळी १०.३० वाजता.
• दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी वेंगुर्ला तालुक्याचा सहकारी मेळावा स्वयंमेश्वर प्रासा.वि.का.स सेवा सोसायटी, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता.
• दि. २० नोव्हेंबर २०२५ सहकार सप्ताहाचा समारोप मालवण येथील जानकी हॉटेल, कुंभारमाठ येथे सकाळी १०.३० वाजता. संपन्न होणार आहे.

सहकार क्षेत्रातील एक प्रेरणादायी व लोकसहभाग वाढवणारा या उत्सवांमध्ये जिल्ह्यातील सहकारातील कार्यरत सर्वच संस्थानी सहभाग घेऊन या उत्सवाला यशस्वी करावे असे आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन सं. सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!