सावंतवाडी (प्रतिनिधी) : सातोसे येथे पहाटे भरधाव रेल्वेच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्थानिकांनी तत्काळ वन विभाग व रेल्वे प्रशासनाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केल्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
या मार्गावर सतत वन्यजीवांचा वावर असल्याने, अपघात टाळण्यासाठी रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा आणि वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.











