‘टेलिमानस’ हेल्पलाइन १४४१६ नागरिकांसाठी २४x७ उपलब्ध
ओरोस (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित मदत घेतल्यास नैराश्य, भीती, ताण-तणाव यांसारख्या स्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे शक्य होते. मानसिक आरोग्य हा व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘टेली-मानस’ टोल फ्री हेल्पलाइन १४४१६ ही मोफत सेवा सर्व सामान्यांसाठी २४x७ ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रशिक्षित मानसोपचारतज्ञ व समुपदेशक या क्रमांकावर त्वरित मार्गदर्शन करून नागरिकांना मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. कोणत्याही प्रकारच्या मानसिक अस्वस्थतेसाठी ही सेवा निःसंकोचपणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन समुपदेशना दरम्यान माहितीची गोपनियता देखील राखण्यात येते. मानसिक ताण-तणाव आणि चिंता, नैराश्याची प्रारंभिक किंवा गंभीर लक्षणे, व्यसन समस्या, कौटुंबिक किंवा नातेसंबंधातील तणाव, मुलांमधील मानसिक समस्या, परीक्षेचा ताण, अत्याधिक विचार, भिती, अस्वस्थता, आत्महत्येचे विचार, तातडीची भावनिक अस्थिरता, आर्थिक किंवा वैयक्तिक तणाव यांसह इतर कोणत्याही प्रकारच्या मानसिक आरोग्य समस्या जाणवल्यास टोल फ्री क्रमांक १४४१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडे लोक ताण-तणाव, चिंता, नैराश्य, नातेसंबंधातील समस्या, परीक्षेचा दबाव, आर्थिक तणाव किंवा स्मृतिसंबंधित अडचणी यांसारख्या भावनिक आव्हानां विषयी खुलेपणाने बोलू लागले आहेत, ही सकारात्मक बदलाची चिन्हे आहेत. मानसिक आरोग्य महत्वाचे असल्याची जाणीव वाढत असून वेळेवर मदत घेणे ही सुदृढतेकडे जाणारी महत्वाची पायरी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचे मार्फत आरोग्य विभागाने नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचे आणि गरज भासल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्वाचे आहे. स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना ताण-तणाव, चिंता, नैराश्य किंवा भावनिक अस्वस्थता जाणवत असल्यास मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. मानसिक आरोग्याच्या कोणत्याही समस्यांसाठी १४४१६ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून मोफत समुपदेशन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.












