शाळा चिंदर कुंभारवाडीचा अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रम शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री सत्यनारायण महापूजा व हळदीकुंकू समारंभाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत, दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले ईशस्तवन व स्वागतगीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव यांनी प्रास्ताविकातून शाळेचा शैक्षणिक प्रवास व योगदान उलगडून सांगताना, “हा कार्यक्रम केवळ उत्सव नसून गेल्या सात दशकांपासून शाळेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ बंधू-भगिनी, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या परिश्रमांचा, संस्कारांचा व शैक्षणिक परंपरेचा स्मरणोत्सव आहे,” असे प्रतिपादन केले. आजपर्यंत शाळेने घडवलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हीच शाळेची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर संजय माने (गटशिक्षणाधिकारी, पं. स. मालवण), देशमुख (शिक्षण विस्तार अधिकारी), चिंदर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शीतल माड्ये, चिंदर गावचे उपसरपंच महेंद्र मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, विनोद पारकर यांच्यासह शाळेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी, समाजातील दानशूर व प्रतिष्ठित व्यक्ती, शाळेच्या विविध समित्यांचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आडगावकर यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

मध्यंतरात सर्वांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला. त्यानंतर विनोद पारकर यांचे सुपुत्र कुमार सिद्धेश्वर व कुमारी क्रांती पारकर यांच्या हस्ते चिंदर केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यानंतर आयोजित मालवण तालुक्यातील निमंत्रित शाळांच्या समूह नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी व यशस्वी बांधकाम उद्योजक संतोष कोदे यांनी रोख बक्षिसांचे प्रायोजन केले, तर विकास पारकर यांनी आकर्षक चषक उपलब्ध करून दिले. या स्पर्धेत शाळा भाग जमडून आचरे यांनी प्रथम क्रमांक, शाळा चिंदर कुंभारवाडी यांनी द्वितीय क्रमांक तर शाळा वायंगणी नं. १ यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सायंकाळी बक्षीस वितरण व ७५ वर्षांवरील वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक अरुण आडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शाळेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, दानशूर व्यक्ती तसेच ग्रामस्थ बंधू-भगिनी यांचे आभार मानले.

error: Content is protected !!