वाहतूक प्रश्नांवर ह्यूमन राईट्स असोसिएशन आक्रमक

उड्डाणपूलावरील एसटी बस थांब्यासह विविध मागण्यांवर परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची ओरोस येथील मोटर वाहन परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वाहतूक विषयीच्या विविध प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा करून प्रलंबित प्रश्न व मागण्या मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. यामध्ये प्रामुख्याने ओरोस जैतापकर काॅलनी समोरील उड्डाण पूलावरती एस्.टी. बस थांबा चुकीच्या पद्धतीने सुरू केलेला आहे तो अपघातास कारणीभूत ठरणारा आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा अद्यापपर्यंत तिथे एसटी बस थांबविल्या जात आहे. त्याठिकाणचा बस थांबा उड्डाण पूला ऐवजी सुरक्षित जागी हलविण्याचे परिवहन विभागाचे आदेश एसटी विभाग पाळत नसेल आणि जर त्याठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार परिवहन आणि एसटी विभाग राहिलं, असा मुद्दा संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी पुन्हा एकदा उपस्थित करीत ठणकावून सांगितले. यावरती तातडीने एसटी विभागाला पत्रव्यवहार केला जाईल, असे श्री.काळे यांनी सांगितले.

संबंधित प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयडी कार्ड असणे बंधनकारक करणे, त्याचबरोबर विभागात आलेल्या पत्रांना वेळेवर लेखी उत्तर देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील रिक्षा चालकांना रिक्षा पासिंगसाठी प्रथम प्राधान्य देणे हा मुद्दा मांडला. तर कोकण विभागात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये रिक्षाचालकांना ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिक्षा चालक कोण व प्रवासी कोण हेच समजत नाहीत. त्यासाठी सर्व रिक्षा चालकांना ड्रेस कोड वापरणे अनिवार्य करावे, असा मुद्दा संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी उपस्थित केला.

जिल्हा खजिनदार हनीफ भाई पीरखान यांनी रेल्वे स्टेशन वरून जवळचे भाडे नाकारले जाते तसेच कणकवली रेल्वे स्थानक थांब्यावर अन्य रिक्षा चालकांना रिक्षा लावण्यास मनाई केली जाते व प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी रिक्षा भरुन प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारले जाते हा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले. मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर यांनी मोटरसायकल भाड्याला देण्याचा परवाना नसताना सुद्धा मालवण मध्ये मोटर सायकल भाड्याने मिळेल अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. मोटरसायकल भाड्याने देण्यात येतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. तसेच रॅपिडो मोटरसायकल संदर्भात चर्चा करण्यात आली. कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सर्व यांच्या कागदपत्रांना लागणारे सहकारी फी चा बोर्ड कार्यालयामध्ये लावण्यात यावा अशी मागणी केली.

कणकवली तालुका सदस्य तथा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस ही एजन्सी रिक्षा चालकांना गॅस किट बसून देते. परंतु परंतु रिक्षा पासिंग करून देत नाही व रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे तरी महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सीला रिक्षाला किट लावण्याचा आपण दिलेला परवाना ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांना बंदी असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुम स्टाईलने सर्रासपणे कर्णकर्कश आवाज करणाऱी वाहने तरुण वर्ग वापरत आहे. त्या आवाजाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी परिवहन विभाग आणि ट्राॅफिक पोलिस पावले उचलण्याची मागणी संजय खानविलकर यांनी मांडली. रिक्षा चालक हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे पर्यटक पर्यटनासाठी येतात तसेच हाफ पॅन्ट घालून प्रवासी वाहतूक करत असतात. अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी केली.
१० डिसेंबर मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कर्मचारी शशांक केणी व सुनील खांदारे यांना सुद्धा संघटनेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, संघटनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा खजिनदार हनिफ भाई पिरखान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष प्रमोद कांडरकर, मुक्ता रजपूत, सीमा धुरी, वैभववाडी तालुका अध्यक्ष प्रकाश माईणकर, संघटनेचे पदाधिकारी श्रावणी मदभावे, सतिश मदभावे, किर्ती आंबेरकर, मंगेश सावंत, कणकवली एस्.टी.बसस्थानकाचे सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक श्री.भोसले, आनंद बाणे, अक्षय शेडेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवरती तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिली.

error: Content is protected !!