दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा एक डंपर ताब्यात घेण्यात आला असून, संबंधित वाहनमालकावर १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
सदर कारवाई रात्री सुमारे १० वाजता करण्यात आली. बांदा येथून कसईमार्गे दोडामार्गकडे जाणारा वाळूने भरलेला डंपर झोळंबे येथील तलाठी श्रीराज सांबारी यांनी संशयावरून थांबवून तपासला. यावेळी चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित डंपर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, मागील दहा दिवसांत महसूल विभागाने अशा प्रकारच्या तीन डंपरवर कारवाई केल्याची माहिती आहे.
दरम्यान, वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई होत असताना तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खडी व काळ्या दगडांच्या वाहतुकीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. तालुक्यात १० चाकी वाहनांतून मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांची खुलेआम वाहतूक होत असून, ही वाहतूक तहसील कार्यालयासमोरूनच दिवसरात्र सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दहा दिवसांपूर्वी खडी वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई झाल्यानंतर तहसील कार्यालयात गौण खनिज व्यावसायिकांची बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र या बैठकीनंतर स्थानिक दगड वाहतुकीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. तहसीलदार राहुल गुरव यांनी भरारी पथक तैनात असल्याचे सांगितले असले, तरी हे पथक केवळ रात्रीच्या वेळी वाळू वाहतुकीवरच कारवाई का करते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली आणि स्थानिक पातळीवरील अवैध खनिज वाहतुकीला नेमके कुणाचे पाठबळ आहे, याबाबत दोडामार्ग तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.










