कळसुली उत्तमनगरमध्ये बिबट्याचा धोकादायक वावर; शेळीवर हल्ला, ग्रामस्थांत भीती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली उत्तमनगर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतकरी विकास बाळकृष्ण दळवी यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यातून शेळी पळवून नेल्याची घटना घडली. बिबट्याने घनदाट जंगलात नेऊन त्या शेळीचा फडशा पाडल्याचे आढळून आले. सदर शेळी दोन महिन्यांची गाभण असल्याची माहिती श्री. दळवी यांनी दिली.

कळसुली गाव परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा सातत्याने वावर जाणवत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. सरपंच सचिन पारधीये यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, वनक्षेत्रपाल, कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी दिगवळे वनपरिमंडळांतर्गत मौजे कळसुली येथे रात्रीची गस्त घालण्यात आली. या गस्तीत दिगवळेचे वनपाल, कळसुली, दिगवळे, नरडवे, जांभळगाव येथील वनरक्षक, जलद बचाव पथक, कळसुली गावचे सरपंच सचिन पारधीये, पोलीस पाटील हरिश्चंद्र गावकर, विकास दळवी, रणजित दळवी, संतोष मुरकर, बाळा भोगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन वनविभागाने दिले असून, ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

error: Content is protected !!