११२१ कवितांच्या ‘आई’ काव्यसंग्रहात जांभवडेचे माजी शिक्षक प्रा. राजेंद्र कदम यांच्या कवितेचा समावेश

साहित्यक्षेत्रातील सर्वांत मोठा काव्यसंग्रह म्हणून ‘आई’ची ग्रीनीच बुकमध्ये होणार नोंद

कणकवली (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील पाचशे नवोदित कवी, कवयित्री यांच्या सहकार्याने ११२१ कविता असलेला ‘आई’ हा प्रातिनिधिक काव्य संग्रह इंडियन असोसिएशन आणि समर्थ फाउंडेशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. या काव्यसंग्रहामध्ये न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे तालुका कुडाळ या प्रशालेचे माजी उपक्रमशील शिक्षक राजेंद्र कृष्णा कदम यांच्या कवितेचा समावेश आहे. सदर काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १४ डिसेंबर, २०२५ रोजी, वि.का.राजवाडे सभागृह, इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे नुकताच पार पडला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून खासदार मेघा कुलकर्णी, पद्मश्री उदय देशपांडे, प्रसिद्ध कवी म. फु.शिंदे, पद्मश्री, विकास महात्मे, ज्येष्ठ कवयित्री मंदा नाईक, इ.मान्यवर उपस्थित होते.

कवयित्री मंदा नाईक यांच्या शुभहस्ते प्रा. राजेंद्र कदम यांचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. कदम यांचे गुरुवर्य, आणि पिंपरी शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी श्री. नायकवडी उपस्थित होते. सांगता कार्यक्रमात ‘आई’ काव्यसंग्रहाचे संपादक आचार्य डॉ. शंकर अंदानी यांनी ११२१ कविता असलेला ‘आई’ काव्यसंग्रह साहित्यक्षेत्रात सर्वात मोठा असून त्याची ग्रीनीच बुक मध्ये नोंद होणार आहे, असे जाहीर केले.

error: Content is protected !!