बनावट नंबर प्लेटसह दारू वाहतूक; आंध्रप्रदेशातील चौघांना अटक
बांदा (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटी दारूची वाहतूक करणाऱ्या आंध्रप्रदेशातील चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे भालावल येथे करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख तौफी रफीवाली (वय २४, रा. तपोवन, आंध्रप्रदेश), पेयला कोंडारेड्डी (रा. अनंतपूर), वेण्णापुसा भास्कर रेड्डी (रा. यादीकि) व नागिरेड्डी गरी दिलीपकुमार (रा. आत्मापूर) अशी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास भालावल येथील दळवी यांच्या बागेसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद अवस्थेत आलेली निळ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार पोलिसांनी अडवली. पोलीस असल्याचे लक्षात येताच वाहनातील दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान वाहनातून २ लाख ४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच १२ लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार असा एकूण १४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी वाहनावर दोन नंबर प्लेट लावण्यात आल्याचे उघडकीस आले. गाडीवर एमएच-०९-डीएफ-६५२९ ही बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती, तर वाहनाची मूळ नोंदणी क्रमांक एपी-०४-बीयू-८००८ असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय तपासणी करून आरोपींना पुढील कारवाईसाठी बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा व आशिष जामदार यांच्या पथकाने केली.










