कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, अन्य गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्समध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन न तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधीत आस्थापना मालकांनी घेवून मतदानाच्या दिवशी संबंधितांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी न दिल्यास 0231-2653714 वर तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.












