न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला स्पर्धेत दैदीप्यमान यश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) घवघवीत यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या या ग्रेड परीक्षेत प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एलिमेंटरी परीक्षेस एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये १४ विद्यार्थी ए श्रेणी व २६ विद्यार्थी बी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ७ विद्यार्थी ए श्रेणी तर ५ विद्यार्थी बी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. अशा दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक के. डी. गांगुर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे पदाधिकारी व संचालक, शाळा समिती अध्यक्ष आणि प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, पर्यवेक्षक श्री. राठोड, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली उपजत कला आणि त्यांना मिळणारे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!