आंदोलकांवर करण्यात आला लाठीचार्ज
रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू येथील रिफायनरीला स्थानिकांचा असलेला विरोध वाढत चालला असून रिफायनरी विरोधात उभारलेल्या आंदोलनाला आता उग्र रूप येत चालले आहे. आज आंदोलकांनी सर्व्हे स्थळावर धडक दिली. पोलिसांकडून सर्व्हे स्थळावरून आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. अश्रूधुरामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यासोबतच पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात येत आहे. तर अनेकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला आहे. त्यामुळे हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.













