इन्सुलीत भीषण आग; कालव्याचे पाईप आणि घर जळून खाक…

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली परिसरात आज लागलेल्या एका भीषण आगीने मोठे थैमान घातले. या आगीत तिलारी कालव्याच्या कामासाठी आणून ठेवलेले पाईप जळून खाक झाले असून, आगीची भीषणता इतकी होती की त्याचे धुराचे लोट थेट बांदा शहरापर्यंत दिसून येत होते. या आगीच्या भक्ष्यस्थानी स्थानिक ग्रामस्थ रतन कळंगुटकार यांचे घर देखील आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी इन्सुली परिसरात अचानक ही आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे आग परिसरात झपाट्याने पसरली. जवळच असलेल्या कालव्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर पीव्हीसी पाईप साठवून ठेवण्यात आले होते. या पाईपांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. प्लास्टिक जळाल्यामुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले होते, ज्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुर्दैवाची बाब म्हणजे, ही आग वाढत जाऊन रतन कळंगुटकार यांच्या घरापर्यंत पोहोचली. ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि बघता बघता कळंगुटकार यांचे घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून कळंगुटकार कुटुंब उघड्यावर पडले आहे. महसूल विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला आणि नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

error: Content is protected !!