पालकमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतंत्र फिडर मंजूर
कलमठ-वरवडेवासीयांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार – संदीप मेस्त्री
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ-वरवडे परिसरात निर्माण होणाऱ्या विजय समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही कलमठ-वरवडेवासीयांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार मानतो. तसेच या स्वतंत्र फिडरचे काम करत असताना कणकवली शहरांमध्ये भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी निर्माण झालेल्या अडचणीबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असल्याचे कलमठ सरपंच तथा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी सांगितले.
कलमठ स्वतंत्र फिडरबाबत श्री. मेस्त्री यांनी उप कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांची भेट घेत चर्चा केली. तसेच सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हायवेलगतच्या जागेतून भूमिगत केबल टाकण्यासाठी निर्माण झालेल्या समस्येबाबत चर्चा करत, याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांच लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. तसेच या स्वतंत्र फिडरसाठी कार्यकारी अभियंता श्री. गवळी, उप कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून चांगले सहकार्य केले असल्याचे श्री. मेस्त्री यांनी सांगितले.
कलमठ-वरवडे परिसरात सातत्याने वीज खंडित होत असे. यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आपण जुलै २०२५ मध्ये पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र देऊन याबाबत स्वतंत्र वीज वाहिनीद्वारे विजपुरवठा व्हावा अशी विनंती केली होती. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यानंतर कलमठ-वरवडे परिसरासाठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला आहे. पालकमंत्री श्री. राणे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याबद्दल आम्ही कलमठ वरवडे पंचक्रोशीच्या वतीने त्यांचे आभार मानत आहोत.
दरम्यान या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम करत असताना कणकवली शहरांमध्ये हायवे लगत भूमिगत वीज वाहिनी टाकून पुढे कलमठसाठी स्वतंत्र वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची परवानगी आवश्यक असून त्यांच्या जागेत सर्विस रोड लगत ही केबल टाकण्यात येणार आहे. यासाठी महावितरणाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे मागणी केली होती. मात्र त्यांनी यासाठी सुमारे २६ लाख रुपये एवढी रक्कम महावितरणला भरणा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून सदरच्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम मे महिन्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाळ्याच्या कालावधीत या दोन्ही गावा व परिसरातील वीज समस्या मार्गी लागणार आहे. म्हणूनच या निर्माण झालेल्या समस्येबाबत आपण लवकरच पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधत याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली असल्याचे श्री. मेस्त्री यांनी सांगितले.











