उष्णतेपासून नागरिकांना दिलासा, पण शेतकरी चिंतेत
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. या अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काजू आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चढत होता. गेल्या चार दिवसांपासून उष्णतेत कमालीची वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि सुमारे अर्धा तास मुसळधार पावसाने वैभववाडी शहर व परिसराला झोडपून काढले.
सह्याद्री पट्ट्यातील सांगुळवाडी, नावळे, करूळ, अरुळे, निमअरुळे, खांबाळे, आचिर्णे, लोरे आदी भागांत जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
काजू पीक सध्या अंतिम टप्प्यात असून, या वादळी पावसासह झालेल्या गारपिटीचा त्याला मोठा फटका बसला आहे. तसेच आंबा पिकालाही नुकसान झाले आहे. यावर्षी आधीच बदलत्या हवामानामुळे काजू व आंबा पिकावर परिणाम झाला होता. त्यात या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने नुकसानात भर पडली आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतकरी हतबल झाला असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.












