बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या ताब्यातील मोटरसायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून अनंत नाटळकर यांच्या दुखापती व उपचारादरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आशिये येथील साहिल संदेश ठाकूर याची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

अनंत नाटळकर हे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील साफल्य स्वीट या दुकानात खाजा घेण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानासमोर मोटरसायकल थांबविली असता समोरून आलेल्या मोटरसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार ठोकर दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर गोवा येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०४ अ २७९, ३३७, ३३८, मोटर वाहन कायदा १८४ ३ (१), १८१ व १४६/१९६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवण्यात आला होता. सुनावणीत एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसणे, बेदरकारपणे अथवा निष्काळजीपणे वाहन चालवले याबाबत ठोस पुरावा सादर न करणे, मृत्यू आरोपीच्या निष्काळजी वाहन चालनामुळे झाला हे सिद्ध न होणे. तसेच उलट पुराव्यातील विसंगती, तपासातील त्रुटी व प्रत्यक्षदर्शी पुराव्याचा अभाव यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

error: Content is protected !!