मानसिक आजारी व्यक्तींना कुटुंब आणि समाजाच्या आधाराची गरज

संदीप परब अध्यक्ष-जीवन आनंद संस्था

दोन महिन्यांच्या प्रयत्नांना जीवन आनंद संस्थेला यश

मानसिक आजारी महिलेचे कुटुंबाशी पुनर्मीलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलिसांनी दि. ४ मे २०२६ रोजी संरक्षण व काळजीसाठी संविता आश्रमात दाखल केलेल्या मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या या महिलेचे तब्बल दोन महिन्यांनंतर तिच्या कुटुंबाशी यशस्वी पुनर्मीलन करण्यात जीवन आनंद संस्थेला यश आले आहे. आश्रमात दाखल झालेल्या या महिलेने वारंवार संवादानंतर आपले नाव पूजा भगवान गवस असे सांगितले. मात्र तिच्या गावाबाबत ती सुरुवातीला दोडामार्ग तालुक्यातील ‘खोक्राळ’ असे सांगत होती. त्यानंतर जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी गुगलच्या माध्यमातून दोडामार्ग पोलिसांशी संपर्क साधून खोक्राळ गावच्या पोलीस पाटलांचा संपर्क क्रमांक मिळविला.पोलीस पाटील शेटकर यांनी महिलेची माहिती विविध व्हॉट्स app गटांवर प्रसारित केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला खोक्राळची नसून दोडामार्ग तालुक्यातील वजरे गावातील असल्याचे समोर आले.

याबाबत पोलीस पाटील शेटकर यांनी वजरे चे पोलीस पाटील प्रितेश खोत यांचा संपर्क नंबर दिला. प्रीतेश खोत यांच्या मदतीने महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. यानंतर पुजाच्या नातेवाईकांनी आश्रमातून पाठविलेल्या छायाचित्रावरून तिची ओळख निश्चित केली. त्यानंतर २ जुलै रोजी तिचे पती, सासरे, आई आणि तीन बहिणी संविता आश्रमात आले व पुजाला ताब्यात घेऊन घरी रवाना झाले. यावेळी संविता आश्रमाचे व्यवस्थापक देऊ सावंत, समन्वयक शैलेंद्र कदम आणि विजया कांबळी उपस्थित होते. आश्रमातील कर्मचाऱ्यांनी दोन महिने पुजाची अत्यंत आत्मीयतेने काळजी घेतली.याप्रसंगी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी, “मानसिक आजारी व्यक्तींना कुटुंब आणि समाजाच्या विशेष आधाराची गरज असते. अशा व्यक्तींकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगितले. तसेच यशस्वी कुटुंब पुनर्मीलन घडवून आणणाऱ्या संविता आश्रमाच्या संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले.

error: Content is protected !!