उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांचीही उपस्थिती
खोरीतील पाच गावातील वीजपूरवठा तात्काळ चालू करा
संबंधित यंत्रणेला सभापतींच्या सूचना
वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील नुकसानग्रस्त घराची वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे यांनी पाहणी केली. घरमालक शंकर अनंत पांचाळ यांना धीर देत प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच निमअरुळे येथील कोसळलेल्या डीपीची देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सरपंच नरेंद्र कोलते, सचिन कोलते, प्रकाश सावंत, महेश कदम, सिद्धेश कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, विद्याधर सावंत, रवींद्र सरफरे, संजय सरफरे आदी उपस्थित होते.
अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच धांदल उडाली. निम अरुळे येथील डीपी (रोहित्र) चक्रीवादळात जमीनदोस्त झाले आहे. त्याचबरोबर डीपी नजीकचे सहा वीज खांब सुद्धा पडले आहेत. त्यामुळे कुर्ली, सडूरे, शिराळे, अरुळे व निम अरुळे या पाच गावाचा पुरवठा पूर्णता खंडित झाला आहे.
मुसळधार पावसाचा फटका करूळ जामदारवाडी येथील शंकर अनंत पांचाळ यांच्या घराला बसला. घरावरील पत्रे उडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाण्याची टाकी फुटली. त्या पाण्यात बुडून पंधरा कोंबडी मृत्यूमुखी पडली आहेत.या पार्श्वभूमीवर वैभववाडी पंचायत समीतीचे सभापती सिध्देश रावराणे, उपसभापती साची कोलते यांनी पांचाळ यांच्या घरी जात पाहणी केली. श्री पांचाळ यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.











