प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; शासनाविरोधात जोरदार निदर्शने

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी उद्यापासून धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा करत शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

मागील १५ महिन्यांपासून सात वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांकडून चर्चेसाठी वेळ न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी व शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवले असून कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे,” असा आरोप यावेळी करण्यात आला. तर जो पर्यंय प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तात्काळ अंमलबजावणी ,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतरच्या पात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी उठवणे, सर्वांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे,
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर नियमित चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान करणे, पदोन्नती संदर्भातील सुधारित धोरण राबवणे, पीएफआरडीए कायदा रद्द करावा, दहा वर्षे सतत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा तसेच १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेचा शासन आदेशाबाबत पुनर्विचार करण्यात यावा .आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या आहेत.
तर
“आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा देत कर्मचाऱ्यांनी उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला.या संप आंदोलनात जिल्ह्यातील मोठ्या संखेने कर्मचारी सहभागी झाले असल्याने
जिल्ह्यातील शासकीय कामकाज ठप्प झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे .

राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, सचिव सत्यवान माळवे, यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात व संपात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते त्यामध्ये राजू वज्राटकर, अजय शिंदे, राजन वालावलकर, अमोल भूतल, एम.जी. गवस, एस. एल, सपकाळ आदीसह मोठ्या संखेने कर्मचारी उपस्थित होते.

कामकाज सुरळीत

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून संप पुकारण्यात आला असला तरी या संपात सर्व कर्मचारी सहभागी नसल्याने सर्व कामकाज सुरळीत सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले . जिल्हा महसुल यंत्रणेतील एकूण ६५८ कार्यरत अधिकारी , कर्मचाऱ्यापैकी आज २१ एप्रिल २०२६ रोजी ३३ कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर आहेत , उर्वरित कर्मचाऱ्यापैकी ४८३ कर्मचारी संपात सहभागी असून १४२ कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!