चौके (प्रतिनिधी) : नांदोस चव्हाणवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वसंत चव्हाण गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, जि. प. सदस्या सुमेधा पाताडे, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, आर. बी. आय चे वरिष्ठ माजी अधिकारी रवी नांदोसकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ चव्हाण उपस्थित होते. यावेळी गायक भारत पेंडूरकर यांनी भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम सादर केला. त्यानंतर महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान या विषयावर आंबेडकर चवळीतील विचारवंत प्राध्यापिका सुषमा हरकुळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, तसेच पाताडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे विचार मांडले, रवी नांदोसकर यांनी शिक्षण या विषयावर बोलताना मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेला पैसा हा कोणता खर्च न समजता त्याला आपल्या मुलांची भविष्यातील सुखी जीवनाची गुंतवणूक समजा असा मोलाचा उपदेश केला. सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या अखेरीस वसंत चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अमित चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चव्हाणवाडीतील सर्व पुरुष महिला, युवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.














