प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त ग्रामसेवकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्न याकड़े लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये वेतन त्रुटी समिती २०२४ च्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून त्याचा लाभ सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतनधारकांना देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अनेक समस्या अद्याप प्रलंबित आहेत. त्या वेळीच सोडवल्या जात नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात सेवानिवृत्त ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या आहेत.

मागण्या

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या सेवानिवृताना निवृत्ती वेतन विक्रीची रक्कम १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे१०० टक्के अदा करावयाची आहे, सदरच्या विषयाचे देखरेख रजिस्टर ठेवून पूर्तता करावी. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्त वेतनधारकांची वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्यांना २० टक्के जादा निवृत्ती वेतन अदा करण्यात यावे. जे निवृत्तीवेतनधारक ३० जून रोजी व ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले असतील त्यांना नियमाप्रमाणे एक काल्पनिक वेतन वाढ द्यावयाचे आहे .त्याचे देखरेख रजिस्टर ठेवून वेळीच पूर्तता करावी. ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतनधारकांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. वेतन त्रुटी समिती २०२४ च्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करून त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा. ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतनधारकांना उत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतन वाढ मंजूर असूनही त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही तरी तो न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदरची वेतन वाढ फरकासहित तीन महिन्याच्या मुदतीत पूर्ण करावी. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा. आदी मागण्या या निवेदनातून केले आहेत. यावेळी अध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण राणे, उपाध्यक्ष हनुमान प्रभू ,सचिव प्रकाश बाबाजी राणे, यांच्यासह सेवानिवृत्त ग्रामसेवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!