वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडवली. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये तासभर कोसळलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर बाजारपेठांमध्ये धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वैभववाडी शहरासह ग्रामीण भागातही या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात जाणवला. अनेक ठिकाणी नागरिकांना आडोशाला थांबावे लागले. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्याने दुकानदारांनाही आपले साहित्य सुरक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागली. अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.
मे महिना सुरू होताच कोकणात लग्नसराईला वेग येतो. गावागावांत विवाह सोहळे, देवस्थानांचे उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी मुंबई-पुण्यासह विविध शहरांतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. मात्र सलग दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये व्यत्यय निर्माण झाला. काही ठिकाणी मंडपांमध्ये पाणी शिरल्याने आयोजकांची धावपळ उडाली, तर खुलेआम आयोजित कार्यक्रम तात्पुरते थांबवावे लागले.
अनेक विवाह सोहळ्यांमध्ये वराती, स्वागत समारंभ आणि भोजन व्यवस्थेवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वधू-वर पक्षासह पाहुण्यांचाही काहीसा हिरमोड झाला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. प्रचंड उष्म्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत होते. अशातच झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उष्णतेपासून तात्पुरता आराम मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी लग्नसराईच्या हंगामात सुरू असलेल्या या पावसामुळे आयोजक मात्र चिंतेत पडले आहेत.












