20 मे रोजी सिंधुदुर्गातील मेडिकल दुकाने बंद

ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट मक्तेदारीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी 20 मे 2026 रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती मक्तेदारी आणि औषध व्यवसायातील असमतोल स्पर्धेविरोधात हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम व सचिव दिगंबर सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्ट 1945 अंतर्गत चालतो. मात्र, ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात अद्याप स्पष्ट व कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने इंटरनेटद्वारे औषध विक्रीसंदर्भात अधिसूचना जारी केली होती; परंतु ती अद्याप कायद्यात रूपांतरित झालेली नाही. यासंदर्भातील प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असून सरकार या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी देण्यात आलेल्या विशेष सवलतींचा गैरफायदा घेत काही ऑनलाइन कंपन्या मोठ्या प्रमाणावर औषध विक्री करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक औषध वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर अंतर्गत औषधांवरील नफा मर्यादित असताना, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर सवलती देत बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा आगाऊ करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा व अत्यावश्यक औषध पुरवठा सुरू ठेवण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष आनंद रासम व सचिव दिगंबर सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!