कणकवली (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या भेडसावत असते. अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी मग तो भोंदू बाबांच्याकडे जातो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो. जादूटोणा विरोधी कायदा समजून घेऊन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न केल्यास जीवन समृद्ध होऊ शकते असे प्रतिपादन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी केले. या वेळी त्यांच्या समवेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा संघटक विजय चौकेकर, पवन कांबळे पोलिस सब इंस्पेक्टर, यशवंत भोसले, वैजयंती करंदीकर, शैलेंद्र घाडी आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी पोलिस अधीक्षक मा. मोहन दहिकर साहेब यांची नुकतीच भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांच्यासाठी जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मा.मोहन दहिकर साहेब यांनी जिल्ह्यातील पोलिस पाटील यांचे लवकरच जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करू असे आश्वासन दिले होते. त्याची सुरुवात कणकवली पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व पोलिस पाटील यांचे जादूटोणा विरोधी कायदाची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करून केली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेत विजय चौकेकर यांनी उपस्थित सर्व पोलिस पाटील आणि पोलिस बांधवांना जादूटोणा विरोधी कायदाचे मार्गदर्शन करताना जादूटोणा विरोधी कायदा देव धर्माविरुद्ध नसून देव धर्माच्या नावावर सर्वसामान्य लोकांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा विरुद्ध असल्याचे समजावून सांगितले. या कायद्या अंतर्गत येणाऱ्या बारा कलमांची सविस्तर माहिती दिली. तसेच या बारा अनुसूची अंतर्गत भोंदू बाबा कसे हातचलाकी करतात आणि प्रात्यक्षिक करून आपल्यात अलौकिक शक्ती प्राप्त असल्याचा दावा करतात त्याची सविस्तर माहिती देऊन भोंदू बाबा जी विविध प्रकारची प्रात्यक्षिके कशी करतात ती सर्व प्रात्यक्षिके करून दाखविली. मूठ मारणे, करणी करणी, भानामती करणे, अंगात भूत येणे, देवी अंगात येणे, श्रद्धा अंधश्रदधा यातील फरक, शुभवेळ, अशुभ वेळ, आदी समाजात असणाऱ्या गैरसमजूती आणि अनिष्ट, अघोरी आणि अमानुष प्रथा या विषयी सखोल माहिती दिली. तसेच या बारा कलमांचे उल्लंघन जर कोणी आपल्या गावात, वाडीत करीत असेल तर त्याची माहिती पोलिस निरीक्षक कणकवली यांना तात्काळ देण्यात यावी जेणे करून वेळीच कोणाची फसवणूक होत असेल तर थांबविता येईल असे सांगितले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी साठ ते पासष्ट पोलिस पाटील यांनी जादूटोणा विरोधी कायदा समजून घेतला.
















