सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : शासकीय कामात अडथळा आणून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी करणे वेंगुर्ले शहरातील म्हाडा कॉलनीतील आरोपी मच्छिन्द्रनाथ प्रताप मोरे याला चांगलेच महागात पडले असून या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीश श्री. इंदलकर यांनी आरोपी मच्छिन्द्रनाथ प्रताप मोरे याला 2 वर्षे सश्रम कारावास सह रोख 9 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी बिनतोड युक्तिवाद करत आरोपी मोरेचा गुन्हा कोर्टासमोर सिद्ध केला. 1 मे 2017 रोजी वेंगुर्ले नगरपरिषद मध्ये फिल्टर ऑपरेटर पदी कार्यरत असलेले जयेंद्र शिवराय चौधरी हे वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील पाईपलाईन गळती दुरुस्ती चे काम पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह करत होते. त्यावेळी आरोपी मच्छिन्द्रनाथ प्रताप मोरे याने आज 1 मे असून कामगार दिन आहे. तुम्ही काम करायचे नाही असे म्हणत पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती चे काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा आणला. यानंतर सीओ कोकरे घटनास्थळी आले असता आरोपीने कोकरे यांच्याशी वाद घालून त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेला.याबाबत फिर्यादी जयेंद्र चौधरी यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार आरोपी मच्छिन्द्रनाथ प्रताप मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केसच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद करत आरोपी मोरे याने शासकीय कामात आणलेला अडथळा तसेच अन्य कलमानुसार दाखल गुन्हाही कोर्टासमोर सिद्ध केला. केस सुनावणी दरम्यान फिर्यादी, पंच, साक्षीदार सीओ कोकरे, दिलीप गिरप, अरविंद मिसाळे तपासी अधिकारी पीआय संतोष कोळी यांच्या साक्षी तपासण्यात आल्या. 9 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल 11 मे रोजी लागला असून न्यायालयाने आरोपीला आयपीसी 353, 352, 506 नुसार दोषी मानले असून त्याला 2 वर्षे सश्रम कारावास तसेच एकूण 9 हजार आर्थिक दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.











