बिलाच्या 3 टक्के रक्कमेचा रेट ; अधीक्षक महादेव तेलीवर एसीबी ची रेड
ओरोस (प्रतिनिधी) : येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांनी एका व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी सापळा रचून कारवाई केली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दिपक माळी यांनी दिलेल्या माहिती नुसार, ४९ वर्षीय एका तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, या बिलात त्रुटी असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम १० हजार रुपये ठरवण्यात आली होती.
तक्रारदाराने या संदर्भात कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ४ मे २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षातच एसीबीने सापळा रचला. ठरलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात पकडण्यात आले होते.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होती. यामध्ये सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी आणि त्यांच्या टीमचा समावेश होता. दरम्यान, पूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाच घेतल्याप्रकरणी महादेव तेली यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











